ठाणे, 8 डिसेंबर (हिं.स.) भारतीय शालेय खेळ महासंघाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने तथा राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षात विविध खेळांच्या १४, १७, १९ वर्षाआतील शालेय मुला-मुलींच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे मार्फत १७,१९ वर्षाखालील मुले व मुली राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन २०२३-२०२४ चे आयोजन दि.०८ डिसेंबर ते १० डिसेंबर २०२३ या कालावधीत ज्येष्ठ कवी व साहित्यिक स्व. बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक्स संकुल, पोखरण रोड-२, ठाणे (प). येथे करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या हस्ते संपन्न झाले
या कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका उपायुक्त आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थी (क्रीडा) श्रीमती मिनल पालांडे, ठाणे महानगरपालिकेचे माजी परिवहन सदस्य श्रीमती उज्ज्वला माने, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना पदाधिकारी प्रमोद चोळकर, अनिल माऊली, महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटना सह सचिव गणेश खानविलकर, छत्रपती पुरस्कारार्थी राजेश कामथे आदि मान्यवर उपस्थित होते.
या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्यातील अमरावती, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व क्रीडा प्रबोधिनी या नऊ विभागातून १८० मुले, १८० मुली, ३६ संघव्यवस्थापक, ३ निवड समिती सदस्य, ३० तांत्रिक अधिकारी व इतर असे एकूण ५०० जण सहभागी झालेले आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची निवास व्यवस्था ठाणे आपत्ती निवारण दल (टी.डी.आर. एफ) येथे करण्यात आलेली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सूवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार
