अहमदाबाद, १४ ऑक्टोबर : भारत आणि पाकिस्तान विश्वचषक सामन्यासाठी अहमदाबादमधील भव्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघासह क्रिकेट प्रेमी सज्ज झाले आहेत. दरम्यान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण (गोलंदाजी) करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर विश्वचषक सामन्यात भारत नेहमीच पाकिस्तानवर वरचढ राहिला आहे. तोच इतिहास कायम राहील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्टेडियमबाहेर चाहत्यांची गर्दी
विश्वचषकादरम्यान दोन्ही संघ एकूण सात वेळा एकमेकांसमोर आले आहेत. पण यातील एकही सामना पाकिस्तानने जिंकला नाही. आता अहमदाबादमध्ये होणाऱ्या या महामुकाबल्यासाठी दोन्ही संघांसह त्यांचे चाहते देखील सज्ज झाले आहेत. सामन्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात लाखो चाहते स्टेडियमबाहेर जमल्याचे दिसत आहे.
भारताचे ११ शिलेदार – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर
पाकिस्तान संघ : बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.
शुभमन गिलचे कमबॅक
डेंग्यू झाल्यामुळे शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यांना मुकला होता. मात्र आता तो कमबॅकसाठी तयार झाला आहे. पाकिस्तान विरोधातील सामन्यापूर्वी शुभमनने नेट्समध्ये कसून सराव केला.
सचिनचा विक्रम मोडण्याची विराटकडे अखेरची संधी
या सामन्यात सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. विश्वचषकात पाकिस्तान विरोधात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने पाकिस्तान विरोधात आतापर्यंत पाच सामन्यात ३१३ धावा केल्या आहेत. १९९२ ते २०११ या दरम्यान पाच विश्वचषकात ७८ च्या जबरदस्त सरासरीने सचिनने ३१३ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९८ राहिली आहे. विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी १२० धावांची गरज आहे.
मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत झालेले सामने
नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत २९ वनडे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १६ वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ १३ वेळा विजयी झाला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २३७ इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २०६ आहे.
