रत्नागिरी, 18 ऑक्टोबर, : डेरवण (ता. चिपळूण) येथील एसव्हीजेसीटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत ओणी (ता. राजापूर) येथील नूतन विद्या मंदिरच्या मुलांच्या संघाने ३२ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेने वर्चस्व कायम राखले.
डेरवण येथे बुधवारपासून जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी १४ वर्षांखालील वयोगटाची स्पर्धा झाली. सर्व ९ तालुक्यांतील मुले व मुली असे १८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. मुलांचा अंतिम सामना नूतन विद्या मंदिर (ओणी) विरुद्ध जि. प. शाळा (फणसवणे, संगमेश्वर) असा झाला. ओणी संघाने फणसवणे संघाचा १ डाव १ गुण असा एकतर्फी पराभव करून ३२ वर्षांनी जिल्हा शालेय स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. ओणी संघाकडून कार्तिक सावंत, मयूर मासये आणि पियूष सुर्वे यांनी अष्टपैलू खेळ केला.
मुलींच्या गटात रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेने ज. गं. पेडणेकर विद्यालय (तळवडे, लांजा) संघावर ४.३० मिनिटे राखून विजय संपादन केला. शिर्के प्रशालेकडून श्रावणी सनगरे, स्वरांजली कार्लेकर आणि अस्मी कार्लेकर यांनी भक्कम बचाव करीत विजयात मोलाचा वाट उचलला. तळवडे संघाकडून कस्तुरी मेस्त्री आणि जान्ही गुरव यांनी पराभव टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
