जालना, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने जालना शहरात आयोजित 14 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. खेळाडूंनी नेहमीच आपल्या विचारांची दिशा सकारात्मक ठेवावी. सकारात्मक विचारांमुळे आपल्या जीवनात प्रगती होत असते व आपण आपले इच्छित ध्येय साध्य करु शकतो, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मेत्रेवार यांनी करुन उपस्थित खेळाडू, प्रशिक्षक, पंच, आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. चंद्रजित जाधव, (सहसचिव भारतीय खो-खो महासंघ), प्रा. जे. पी. शेळके (शिव छत्रपती पुरस्कार विजेते तथा खो खो असोसिएशन चे माजी सचिव),ॲड. गोविंद शर्मा (सरचिटणीस खोखो असोसिएशन महाराष्ट्र), जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, सुहासिनी देशमुख (जिल्हा क्रीडा अधिकारी बीड ), प्राचार्या डॉ. भागवत कटारे (उपाध्यक्ष जिल्हा खो-खो असोसिएशन ), डॉ. रफिक शेख ( सचिव जिल्हा खो खो असोसिएशन), दीपक सपकाळ ( तांत्रिक समिती प्रमुख ), निवड समिती सदस्य प्रशांत पवार, मनीषा मानकर, विकास सुर्यवंशी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी दीपक जगदाळे, शेख चाँद पी.जे. (जिल्हा क्रीडा संघटक तथा सचिव जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन), प्रमोद खरात (क्रीडा प्रबोधिनी प्रमुख), प्रियंका येळे (शिव छत्रपती पुरस्कार विजेती खेळाडू), प्रकाश कुंडलकर (मुख्याध्यापक जि. प. प्रशाला मुलांची जालना), प्रा. डॉ. बाप्पासाहेब म्हस्के, क्रीडा संघटक विजय गाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्तावीक विद्यागर यांनी केले. त्यांनी आयोजित स्पर्धेचे महत्व विषद केले. उद्घाटन प्रसंगीं उपस्थित खेळाडूंनी उत्कृष्ट पथ संचलन करत मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी प्रबोधिनीच्या राष्ट्रीय खेळाडूंच्यावतीने मशाल मैदानावर फिरविण्यात येऊन उद्घाटक अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटविण्यात येऊन स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार
