अबुुधाबी, 20 सप्टेंबर (हिं.स.)आशिया कपमध्ये अखेरच्या साकळी सामन्यात भारत आणि ओमानचा सामना झाला. सामन्यानंतर ओमानचे सर्व क्रिकेटपटू मैदानावर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत संवाद साधताना दिसले होते. या संभाषणानंतर ओमानच्या क्रिकेटपटूंनी सूर्यकुमार यादवचे कौतुक केले.
ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्यांच्या संघाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे सराव करण्याची संधी मिळावी यासाठी विनंती केली आहे. संभाषणानंतर ओमानच्या कर्णधाराने पत्रकारांना सांगितले, मला वाटते की, जर आपण भारताला आपले दुसरे घर बनवू शकलो तर आपण एनसीएमध्ये सराव करू शकतो. आपल्या कौशल्यांवर आणि तंदुरुस्तीवर काम करू शकतो आणि क्लब आणि रणजी संघांसोबत बरेच टी-२० सामने खेळू शकतो. यामुळे आम्हाला मदत होईल आणि आमचा खेळ सुधारेल.
तो पुढे म्हणाला, मी खूप आभारी आहे की, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आला आणि आमच्या क्रिकेटपटूंशी त्याने संवाद साधला. तो खेळाबद्दल आणि टी-२० मध्ये कसे खेळायचे याबद्दल बोलत होता. मुले फक्त प्रश्न विचारत होती आणि त्यांचे विचार स्पष्ट करण्यासाठी त्याच्याशी संवाद साधत होती. तो संघाचे खूप कौतुक करत होता.
भारतीय संघाने ओमानचा २१ धावांनी पराभव केला. जरी भारतीय संघाने सामना जिंकला तरी ओमानने चाहत्यांची मने जिंकली. ओमानने विश्वविजेत्या संघाविरुद्ध संपूर्ण ४० षटकांसाठी संघर्ष केला. या सामन्यात भारतीय संघाला १० फलंदाज आणि ८ गोलंदाज मैदानात उतरवावे लागले. तरीही भारतीय संघ ओमानच्या केवळ ४ फंलदाजांना बद करु शकला.
जतिंदर म्हणाला, मला माझ्या संघाचा खूप अभिमान आहे, जसे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. मला वाटते की, संघासाठी त्यांची परिस्थिती समजून घेण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ होते आणि त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी जगातील नंबर १ संघाविरुद्ध उत्तम उत्साह दाखवला. आमचे क्रिकेटपटू यातून बरेच काही शिकतील.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
