नाशिक, १४ डिसेंबर, (हिं.स) – अशोका ग्लोबल प्री-स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेला ५ वर्षीय वेद सौरभ सरोदे या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकाने वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप २०२३ या स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. वयाचा विचार करता, वेद हा या स्पर्धेतील तिसर्या क्रमांकाचा युवा मेमरी ॲथलिट ठरला आहे.
या तीन दिवसांच्या स्पर्धेमध्ये १३ देशांतून ७८० स्पर्धक सहभागी झाले होते. या सर्व स्पर्धकांच्या वयाच्या तुलनेत वेदला तिसरा युवा स्पर्धक होण्याचा बहुमान मिळाला. नुकतीच ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये सहभागी होतांना वेदने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे दर्शन घडवितांना सर्वांचे लक्ष वेधले. जर्मनीच्या इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेमरी (आयएएम) यांच्या मार्गदर्शनाखाली व ब्रेन इन्फिनाईटच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन केले होते.
वेदच्या या यशस्वी कामगिरीतून अशोका ग्लोबल प्री-स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, गुणकौशल्यांना वाव देण्यासाठी पुरक असे शैक्षणिक वातावरण उपलब्ध करुन दिले जात असल्याचे अधोरेखीत करते. वेदला यशस्वी कामगिरीसाठी त्याची आई डॉ.भाग्यश्री सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले असून त्यांनी स्वतः मेमरी कोच अमृत जाधव यांच्या प्रशिक्षण घेतले असून, ब्रेन इन्फिनाईटच्या सदस्या आहेत. तसेच वडिल डॉ.सौरभ सरोदे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. अशोका ग्लोबल प्री-स्कूलतर्फे वेदच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले असून, यापुढेदेखील अशा स्वरुपाचे विद्यार्थ्यांमध्ये दडलेले कौशल्ये बाहेर आणत त्यांना जागतिक स्तरावर प्रतिनिधीत्त्वाची संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.
हिंदुस्थान समाचार
