नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर (हिं.स.) इराणने वॉशिंग्टनमध्ये पुढील आठवड्यात होणाऱ्या २०२६ च्या विश्वचषक फुटबॉल ड्रॉवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.अमेरिकेने त्यांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्यांना व्हिसा देण्यास नकार दिल्यामुळे हा निर्णय इराणने घेतला असल्याची चर्चा फुटबॉल जगतामध्ये आहे.
इराण फुटबॉल फेडरेशनचे प्रवक्ते अमीर महदी अलावी यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना क्रीडाविषयक चिंतांपेक्षा व्हिसा संबंधित समस्या अधिक येत आहेत. दरम्यान, अमेरिकेने या सगळ्यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अलावी म्हणाले की, फेडरेशनने फुटबॉलची प्रशासकीय संस्था फिफाशी संपर्क साधला आहे. आणि आशा आहे की ते या समस्येचे निराकरण करण्यास मदत करतील. फिफाने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जूनमध्ये इराणसह १२ देशांच्या नागरिकांवर प्रवास बंदी जाहीर केली. या यादीत गेल्या आठवड्यात विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या हैतीचाही समावेश आहे.
पुढील वर्षी ११ जून ते १९ जुलै दरम्यान अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या विश्वचषकात विक्रमी ४८ संघ सहभागी होणार आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
