१९ वर्षांखालील महिलांची फ्रेंडशिप ट्रॉफी
नाशिक, १२ नोव्हेंबर (हिं.स.) – हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे असलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील महिलांच्या फ्रेंडशिप ट्रॉफीतील सलग तीन एकदिवसीय व दोन्ही टी-ट्वेंटी सामन्यांत , एन डी सी ए गर्ल्स संघाने , दहिसर स्पोर्ट्स क्लबवर उत्तम सांघिक कामगिरीने ५-० असा निर्भेळ विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न दहिसर स्पोर्ट्स क्लब पॉवर्ड बाय नवनीत फाउंडेशन या संघाने , फ्रेंडशिप ट्रॉफी अंतर्गत , एकदिवसीय ४० षटकांचे मर्यादित एकूण तीन व दोन टी-ट्वेंटी सामने अशी मालिका खेळण्यासाठी नाशिकचा दौरा केला . हि फ्रेंडशिप ट्रॉफी विजेत्या एन डी सी ए गर्ल्स संघास दहिसर स्पोर्ट्स क्लबचे सेक्रेटरी व प्रशिक्षक प्रवीण गोगरी आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांचे शुभहस्ते बहाल करण्यात आली. प्रवीण गोगरी व समीर रकटे यांनी याप्रसंगी दहिसर व नाशिक संघांस मार्गदर्शन केले.
त्यापूर्वी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात एन डी सी ए गर्ल्स संघाने , दहिसर स्पोर्ट्स क्लबवर ९७ धावांनी मोठा विजय मिळवला. एन डी सी एच्या ४ बाद २०३ मधील कार्तिकी गायकवाड नाबाद ८५ व श्रुती गीते ६७ धावा तसेच वैभवी बालसुब्रमणीयम ४ बळी या विजयाच्या प्रमुख शिल्पकार ठरल्या. दहिसर स्पोर्ट्स क्लबच्या १०६ धावांत खुशबू पालने २२ धावा केल्या.
हिंदुस्थान समाचार
