नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी (हिं.स.) येथे सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप २०२६ मध्ये, भारताच्या मनू भाकरला महिलांच्या २५ मीटर पिस्तूल स्पर्धेत शूटऑफमध्ये पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
आठ महिलांच्या शूटआउटमध्ये, पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकलेल्या मनू भाकरने सुरुवातीला संथ सुरुवात केली होती. पण नंतर जोरदार मुसंडी मारत तिने पाच-पाच शॉट्सच्या १० मालिकेत एकूण ५० शॉट्सनंतर व्हिएतनामच्या गुयेन थुय त्रँगशी ३५-३५ अशी बरोबरी साधली.
चौथ्या मालिकेच्या शेवटी भारतीय नेमबाज त्रँगपेक्षा तीन शॉट्सने पिछाडीवर होती. पण मनू भाकर टाय-ब्रेकिंग शूटऑफमध्ये आपली कामगिरी कायम ठेवू शकली नाही. पहिला राऊंड २-२ असा बरोबरीत संपल्यानंतर, त्रँगने दुसरा राऊंड ३-२ ने जिंकून सुवर्णपदक पटकावले.
विशेष म्हणजे, २५ मीटर पिस्तूलमधील हे मनू भाकरचे पहिले वैयक्तिक खंडीय नेमबाजी पदक आहे. तिची यापूर्वीची तीन पदके, ज्यात दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे, ती सर्व १० मीटर एअर पिस्तूलमधील होती. या वर्षीच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनू भाकरची कामगिरी निराशाजनक राहिली, कारण ती वैयक्तिक गटात सातव्या स्थानावर राहिली. पण तिने या स्पर्धेच्या सांघिक गटात भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मदत केली. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत मनू भाकर अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही.
दरम्यान, या स्पर्धेत यापूर्वी १० मीटर एअर पिस्तूल महिला गटात आशियाई चॅम्पियन बनलेल्या ऑलिम्पियन ईशा सिंगने रविवारी २५ मीटर स्पर्धेत ३० गुणांसह कांस्यपदक पटकावले. आणखी एक भारतीय नेमबाज, रिदम संगवान, २७ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिली.यापूर्वी, ईशा सिंगने पात्रता फेरीत ५८९ – २४x गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. मनू भाकर ५८४ – १८x गुणांसह दुसऱ्या स्थानावर होती, तर रिदम संगवान ५७८ – २२x गुणांसह आठव्या स्थानावर राहिली. अभिज्ञा अशोक पाटील ५७८ – ९x गुणांसह नवव्या स्थानावर आली, पण ती केवळ रँकिंग गुणांसाठी (RPO) खेळत होती.
ईशा, मनू आणि रिदम या त्रिकुटाने भारतासाठी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत १७५१ च्या एकत्रित गुणांसह सुवर्णपदकही मिळवले. चायनीज तैपेई आणि व्हिएतनामने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. सोमवारच्या पदकांच्या कमाईमुळे, सध्या सुरू असलेल्या आणि केवळ रायफल व पिस्तूल स्पर्धांचा समावेश असलेल्या या अजिंक्यपद स्पर्धेतील वरिष्ठ गटातील स्पर्धांमध्ये भारताची एकूण पदकांची संख्या १५ वर पोहोचली आहे. ज्यात आठ सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धा आशियाई नेमबाजी महासंघाद्वारे आयोजित केली जात आहे आणि ती १३ फेब्रुवारी रोजी समाप्त होईल. डॉ. कर्णी सिंग नेमबाजी रेंजमध्ये २० वेगवेगळ्या देशांचे नेमबाज पदकांसाठी स्पर्धा करत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
