अहमदनगर, 7 नोव्हेंबर, (हिं.स.) : पुणे जिल्ह्यातील फुलगाव येथे ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांना अहमदनगर जिल्हा संघाच्या वतीने कुस्ती खेळण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की,कुस्ती क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू निर्माण होत असून जिल्ह्यातील मल्लांना योग्य मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.त्या माध्यमातून चांगले मल्ल निर्माण होतील व नगर जिल्ह्याला कुस्ती क्षेत्रामध्ये बहुमान मिळवून देतील.महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील मल्लांनी चांगली कामगिरी करावी.याचबरोबर शिस्त पाळावी जिमचे स्वरूप आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे.तरी मल्लांनी लालमातीची संस्कृती नष्ट होऊन देऊ नये.नगर जिल्ह्यातील लाल मातीचा बहुमान वाढवण्यासाठी मल्लांनी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
संघाचे सचिव पैलवान डॉ.संतोष भुजबळ म्हणाले की,कुस्तीगीरांना राजर्षी मिळाला पाहिजे.छत्रपती शाहू महाराज यांनी कुस्ती वाढविण्यासाठी मोलाचे योगदान दिले होते.त्याच पद्धतीने आमदार संग्राम जगताप हे नगर जिल्ह्यातील मल्लांना मदत करण्याचे काम करत आहे.मल्ल हा गरीब कुटुंबातील असतो.त्याला मदत करण्याचे काम अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघ करणार आहे.आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कुस्ती संकुल उभे राहणार आहे .कुस्ती खेळाच्या माध्यमातून प्रेरणा मिळत असते असे ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार
