भंडारा २१ जानेवारी (हिं. स.) : राम मंदिराच्या निमित्ताने उद्याचा दिवस उत्सवाचा आहे. राम मंदिर म्हणजे मूर्ती भारताच्या अस्मितेची प्रतिकृती आहे. गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी राम रथ यात्रा काढली. या यात्रेची सांगता आज झाली. यानिमित्त फडणवीस बोलत होते.
आपल्या देशाचे प्रधानमंत्री त्या ठिकाणी राम ललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतील. तेव्हापासून एक नवीन भारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक असा भारत ज्याला आपल्या संस्कृतीवर गर्व आहे. एक असा भारत की जो कुठल्याही प्रकारच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये राहणार नाही. गुलामीची प्रत्येक निशाणी त्या ठिकाणी संपेल आणि जगाच्या पाठीवर आपला विचार दृढपणे सांगणारा भारत हा उद्यापासून आपण तयार करतो आहोत आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी हा दिवस अगदी उत्सवाप्रमाणा साजरा करा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.
हिंदुस्थान समाचार
