लातूर, 12 मार्च, (हिं.स.)। निलंगा तालुक्यात अनेक गॅस ग्राहकांना बुकिंग करूनही वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑनलाईन गॅस बुकिंग करून ओटीपी प्रक्रिया पूर्ण केली तरीही अनेक वितरक एजन्सींकडून ग्राहकांना गॅस दिला जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात गेल्या आठ दिवसांपासून गॅसचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर साठेबाजांविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांनी दिला आहे.
निलंगा तालुक्यातील विविध गावांमधून एचपी गॅस व भारत गॅसच्या पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी समोर येत आहेत. ग्राहकांनी गॅस बुकिंग करून ओटीपी प्रक्रिया पूर्ण केली असतानाही सिलेंडर मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, तालुक्यातील काही गॅस एजन्सीकडे मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याची माहितीही समोर आली आहे. शिवाजी गॅस एजन्सीकडे सध्या 621, अंबिका गॅस एजन्सीकडे 361, शेषनाग गॅस एजन्सी (औराद) येथे 571, तर विरेन गॅस एजन्सी (पान चिंचोली) येथे 180 सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा गॅस सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचत नसल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान गॅस एजन्सीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सेनेने दिला आहे. यासंदर्भात निलंगा तहसीलचे नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक अमोल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले
—————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
