ठाणे,७ ऑक्टोबर, (हिं.स) : ऊर्जा, पर्यावरण व जल परिषदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन सुधारित आराखडा तयार करणे, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करणे, ही एक अत्यंत चांगली सुरुवात आहे. ऊर्जा, पर्यावरण व जल परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी येथे व्यक्त केला. तसेच या संस्थेचे प्राथमिक सहाय्य, ज्ञान, कौशल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांचे विशेष आभार मानले.
ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा परिपूर्ण करण्यासाठी ऊर्जा, पर्यावरण व जल परिषदेच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येतील, याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ऊर्जा, पर्यावरण व जल परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, ऊर्जा, पर्यावरण व जल परिषदेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी डॉ.विश्वास चितळे, नितीन बस्सी, डॉ. अभिषेक कार व त्यांचे सहकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, नगररचना उपसंचालक श्री. नगररचना, सांख्यिकी उपसंचालक श्रीम.संगिता मोरे, तहसिलदार संजय भोसले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संगिता पाटील, भरत साळुंके व इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले, या विषयासंदर्भात पूर्वी दोन-तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक प्रभावी करण्याच्या अनुषंगाने एका चांगल्या दर्जाच्या संस्थेच्या तांत्रिक ज्ञानाचा आपल्याला निश्चित लाभ होईल. ठाणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण आणि सुधारित व्हावा, आपत्तीप्रवण भागामध्ये आपत्तीपासून संरक्षण आणि आपत्तीत होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमीत कमी व्हावे, यानुषंगाने पूर्वीच्या आराखड्यामध्ये काही सुधारणा सूचविण्यात आल्या आहेत. यासाठी विशिष्ट कार्यपद्धती विशद करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीनुसार नागरी भागामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा होतो, वॉटर लॉगिंग होते, पूर येतो अशी ठिकाणे निवडणे, त्याची कारणे शोधून त्याचे निवारण करणे आवश्यक आहे. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा व व्यवस्थापन, त्याची क्षमता, त्या क्षमतेचा योग्य वापर आणि त्या संदर्भात असलेले शास्त्रीय ज्ञान आणि तज्ञांनी सूचविलेले उपाय या सर्व बाबींचा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. एकंदरीतच ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये उपयोग होईल, अशा पद्धतीने या संस्थेचे सहकार्य घेण्यात येईल.
दरडप्रवण क्षेत्रामध्ये जे लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्यांना सुखरूपपणाने बाहेर काढणे, त्या दरडीच्या संदर्भात काही शास्त्रीय आधारावर तेथील समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. त्यासोबतच पाण्याचा वापर, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा व व्यवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून अन्य कारणांसाठी या पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना, हवेचे प्रदूषण रोखणे, चांगल्या दर्जाची शुध्द हवा ठाणेकरांना मिळावी, यानुषंगाने हवेच्या प्रदूषणाचे घटक कोणते आहेत, त्यांचे शोध घेवून, त्या घटकांची ज्या ठिकाणी उत्पत्ती होते ती ठिकाणे शोधून काढणे आणि त्याचे निराकरण करणे, त्यानुषंगाने विशेष तज्ञांना असलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणे, या सर्व बाबींवर देखील सर्वंकष चर्चा झाली.
शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
हिंदुस्थान समाचार
