नागपूर, ७ ऑक्टोबर (हिं.स.) : आशियाई क्रीडा स्पर्धेत नागपूरच्या ओजस देवतळेने तिरंदाजी (आर्चरी) मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. ओजसने तिसरे सुवर्ण पदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आशियाई स्पर्धेत नागपूरच्या ओजस देवतळे याने बुधवारी, गुरुवारी आणि आता तिसर्यांदा सुवर्ण पदकाची कमाई करत इतिहास घडवला आहे. तो जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.
चीनमधील हांग्जो येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये नागपूर-बुलढाणा येथील खेळाडूंनी इतिहास रचला आहे. नागपूरचा ओजस देवतळे, बुलढाण्याचा प्रथमेश जव्हारकर आणि अभिषेक वर्मा या खेळाडूंच्या पुरुष कम्पाऊंड संघाने सुवर्णपदक पटकावत देशासह महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
फडणवीसांकडून आई-वडिलांचे अभिनंदन
नागपूरच्या इतिहासात प्रथमच खेळाडूने आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम केला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओजसचे वडिल प्रवीण देवतळे आणि आई अर्चना देवतळे यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण साधत त्यांचे अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
