नाशिक, २१ डिसेंबर (हिं.स.) : केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात बहुचर्चित असलेली दि नाशिक मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली असून रविवारी (दि. २४) होणाऱ्या या पंचवार्षिक निवडणुकीकरिता नाशिक जिल्हा, राज्य व राज्याबाहेरील अशा ३२४ केंद्रांची व्यवस्था मतदानात करता करण्यात आली आहे.
बँकेच्या या मतदानाकरता १ लाख ८८ हजार ६३८ मतदार असून मतदानाच्या दिवशी सर्व केंद्रांवर अडीच हजार अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ९९ ठिकाणी ३२४ मतदान केंद्राची रचना करण्यात आली आहे. शहरात १५५ केंद्रे, ग्रामीण भागात १४४ केंद्रे, नाशिक जिल्ह्याबाहेरील मुंबई, पुणे, चाकण, संभाजीनगर, जालना, वैजापूर, जळगाव, धुळे, दोंडाईचा, नंदुरबार, अहमदनगर, श्रीरामपूर, राहता व संगमनेर आदी वीस मतदान केंद्रांवर तर राज्याबाहेरील सुरत, हैदराबाद येथे प्रत्येकी एक व दोन याप्रमाणे मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदानाच्या वेळी सभासदांनी आपली ओळख पटवण्यासाठी आधार- कार्डव व अत्यावश्यक पुरावे घेऊन जाण्याचे आवाहन निवडणूक अधिकारी फैयाज मुलांनी यांनी केले. या सर्व केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान केले जाणार असून मतमोजणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. २५) सकाळी आठ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पूर्ण होईपर्यंत श्री संभाजी इंडोअर स्टेडियम, सिंहस्थनगर, सिडको येथे १०८ टेबलांवर केली जाणार असल्याचे मुलानी यांनी सांगितले.दरम्यान सत्ताधारी प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांनी शहर जिल्ह्यात आवश्यक ठिकठिकाणी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेऊन अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले आहे, तर सात अपक्ष उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचार सुरू ठेवला आहे.
हिंदुस्थान समाचार
