नाशिक, २१ डिसेंबर (हिं.स.) – पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने तीन जणांनी एका तरुणास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने वार करून चार हजार रुपये बळजबरीने हिसकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी मोहंमद आदाब हुसेन जाफरी (२६, स. राहुल अपार्टमेंट, लामखडे मळा, नाशिक) हा तरुण दिंडोरी रोडवरील भाजी मार्केट यार्ड येथे होता. त्यावेळी आरोपी गोपाल मोरे, जना काकड व शुभम् (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या तिघांनी संगनमत करून जाफरी याच्याकडे पैसे मागितले. ते देण्यास नकार दिला म्हणून तिघा आरोपींना राग आल्याने त्यांनी जाफर यास शिवीगाळ, मारहाण व दमदाटी करून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने वार केला, तसेच त्याच्याजवळ असलेले चार हजार रुपये बळजबरीने काढून घेत पळून गेले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
