डोंबिवली, ०४ ऑक्टोबर : पश्चिम डोंबिवली लोकवस्तीचा विचार केला तर वीज पुरवठ्याची समस्या नेहमीच त्रासदायक ठरत आहे. सध्या दोन फिडर माध्यमातून वीज पुरवठा होत आहे. परिणामी अखंडित वीजसाठी अधिक फिडरची गरज आहे. पश्चिम डोंबिवलीकरांना 24 तास काही वेळा विजेविना राहावे लागत आहे. डोंबिवलीतील वीज ग्राहकांची वीज बिल वसुली जवळजवळ शंभर टक्के आहे. परिणामी त्यांनी एक तास तरी अंधारात का राहावे ? यासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा शिवसेना युवा नेते दिपेश म्हात्रे यांनी महावितरण कंपनीकडे पश्चिम डोंबिवलीसाठी सहा फिडरची मागणी केली आहे.
महावितरण कंपनी अधिकाऱ्यांबरोबर डोंबिवली पश्चिमेतील विज पुरवठा संबंधित म्हात्रे यांच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती . डोंबिवली पश्चिम येथे सध्या स्थितीमध्ये महावितरण कंपनीच्या माध्यमातून दोन फिडर च्या सहाय्याने वीजपुरवठा होत आहे. हे दोन फीडर मानपाडा येथील सबस्टेशन येथून डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर सबस्टेशनला जोडले गेले आहेत. हे दोन फिडर बंद झाल्यास संपूर्ण डोंबिवली पश्चिम विभाग अंधारात जाऊ शकतो व खंडीत वीज पुरवठा अखंडित करण्यासाठी कमीत कमी २४ ते ४८ तास इतका वेळ लागु शकतो. वाढती लोकसंख्या व खंडीत होणारा वीज पुरवठ्याची समस्या लक्षात घेता डोंबिवली पश्चिम विभागाला महावितरण कंपनीसाठी स्वतंत्र सबस्टेशन करिता जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. तसेच पडघा सबस्टेशन येथून लोढा अप्पर ठाणे सबस्टेशन ते मोठागाव मानकोली उड्डाणपूलावरून डोंबिवली पश्चिम विभागासाठी अतिरिक्त सहा फीडर उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी म्हात्रे यांनी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडे केली.
