रत्नागिरी, 31 जानेवारी, (हिं. स.) : कोकणासह मुंबईही पूर्णपणे बदलली आहे. मूळच्या कोकणातील लेखकांनी निर्माण केलेले साहित्य कोकणाचे चित्रण करणारे होते. आजकाल वास्तवाशी संबंध असलेल्या साहित्याची निर्मिती होत नाही. बदललेल्या कोकणाचे वास्तव असलेल्या ग्रामीण साहित्याची आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी केले.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने रिंगणे (तालुका लांजा) येथे आयोजित केलेल्या अकराव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. आज सकाळी ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाचा प्रारंभ झाला. मुंबईच्या कामगार रंगभूमीवरील ज्येष्ठ साहित्यिक लाडकोजी कृष्णा आयरे यांचे मूळ गाव असलेल्या रिंगणे गावात भरलेल्या या साहित्य संमेलनाच्या नगरीला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
केतकर यांनी मुंबई आणि कोकणाच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. कोणे एकेकाळी मुंबईतून येणाऱ्या मानिऑर्डरवर कोकणाची उपजीविका चालत असे. आता चित्र नेमके उलटे झाले आहे. कोकणातल्या जमिनी, जागा विकून मिळणारे पैसे मुंबईकरांना पुरविले जात आहेत. हे मुंबईचे आणि कोकणाचे बदललेले वास्तव आहे. श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर अशा जुन्या साहित्यिकांकडून त्यावेळच्या कोकणाचे चित्रण होत होते. कोकणवासीयांच्या भावभावना, नातेसंबंध, निसर्ग याचा उल्लेख त्यात असे. त्यावरून कोकण समजत असे. पण आता चित्र बदललेले आहे. या बदललेल्या वास्तवाचे चित्रण करणारे लेखन आज कुठेही दिसत नाही, असेही श्री. केतकर म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. लयाला जाणाऱ्या कोकणच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकडून साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने होत आहे. त्यामुळे हे पूर्णपणे वेगळे साहित्य संमेलन आहे. खऱ्या अर्थाने विचारांना चालना देण्याचे काम या संमेलनातून होते.संमेलनाच्या निमित्ताने चित्र प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध मान्यवरांनी या प्रदर्शनांचे उद्घाटन केले. इतिहासाचे अभ्यासक सुनील कदम यांचे शस्त्रास्त्र प्रदर्शन, कणकवलीतील संदेश पत्रांचे संग्राहक निकेत पावसकर यांनी संकलित केलेल्या दोन हजाराहून अधिक पत्रांचे प्रदर्शन अशा प्रदर्शनांचाही त्यामध्ये समावेश आहे.संमेलनात दुपारनंतर विविध परिसंवाद झाले. समाजातील विविध २६ मान्यवरांचा सत्कार रविवारी, दिनांक १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यानंतर संमेलनाचा समारोप होईल.
—————
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी
