नाशिक, ८ ऑक्टोबर : उसतोड कामगारांच्या व्यथा व परिस्थिती जवळून पाहिलेल्या व स्वतः ऊसतोड कामगार राहिलेल्या शेवगाव तालुक्यातील सचिन खेडकर यांना उचल फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याबद्दल नाशिक येथे नीलवसंत फाउंडेशनचा यंदाचा स्व.आ.डॉ.वसंतराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
एक लाख रु रोख, मानपत्र आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लहानपणीच ऊसतोड म्हणून काम केलेल्या व घरात अठराविश्व दारिद्र्य पाहिलेल्या या शेवगावच्या भूमीपुत्राने ऊसतोड कामगारांच्या घेतल्या जाणाऱ्या उचल ह्याच शब्दाला अधोरेखित करून उचल फाउंडेशनची स्थापना केली. दरवर्षी दसरा-दिवाळी दरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरु होतात. ऊस तोडणीच्या कामासाठी मजूर सहा-सहा महिने कारखान्याच्या कामासाठी स्थलांतरीत होतात. ह्या काळात त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावे ह्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ज्या वाड्यात वास्तव्यास होत्या तो वाडा स्नेहालय परिवाराच्या मदतीने जीर्णोद्धार करत उसतोड कामगारांच्या बालकांचे संगोपन व शैक्षणिक पुर्नवसन केले जात आहे.
नीलवसंत फौंडेशनचा यंदाचा १२ वा स्मृती पुरस्कार आहे. समाजातील अत्यंत दुर्लक्षित राहिलेल्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा ऐकताना सभागृहातील श्रोतेही काही काळ भावूक झाले होते. याप्रसंगी दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देत सचिन खेडकर यांच्या ह्या कार्याचे कौतुक केले. पुरस्कार योग्य व्यक्तीला प्रदान केल्याचे समाधान असल्याचे मत नीलवसंत फाउंडेशनच्या अध्यक्षा निलीमाताई पवार यांनी मांडले.
