ठाणे, 3 फेब्रुवारी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे श्री. श्रीनिवास ब्रि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आणि ठाणे जिल्हा वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत राजभाषा मराठीचे संवर्धन, प्रसार व जास्तीत जास्त न्यायालयीन कामामध्ये मराठी भाषेचा वापर या विषयावर ठाणे जिल्हा वकील संघटना, ठाणे यांचे विधीज्ञ कक्ष येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सचिव ईश्वर कां. सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक वक्ते जेष्ठ विधीज्ञ अॅड. गजानन बी. चव्हाण, माजी अध्यक्ष व सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा, अॅड. प्रशांत कदम, ठाणे जिल्हा वकील संघटना व पदाधिकारी अध्यक्ष आणि वकील उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून अॅड. श्री. गजानन बी. चव्हाण, जेष्ठ विधीज्ञ तथा माजी अध्यक्ष, बार काऊंसील ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी उपस्थितांना न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करणे, इंग्रजी भाषेऐवजी मराठी भाषेत काम करत असतांना येणाऱ्या अडचणी, तसेच नित्य व्यवहारात चालणारे इंग्रजी शब्दाऐवजी मराठी भाषेचा वापर करण्याचे आवाहन करुन उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच न्यायालयीन कामकाजामध्ये मराठी भाषेचा वापर होण्यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयातून चळवळ सुरु झाली होती याचीही आठवण करुन दिली.
त्यानंतर ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर कां. सूर्यवंशी यांनी उपस्थितांना मराठी भाषेचा वापर न्यायालयीन कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात करावा, असे आवाहन केले.
ठाणे जिल्हा वकील संघटना अध्यक्ष अॅड. प्रशांत कदम यांनी उपस्थिांना मराठी भाषेतील माधुर्य स्पष्ट केले आणि मातृभाषा ज्ञानभाषा म्हणून पुढे आल्यास तिचे संवर्धन नक्कीच होईल असा विश्वास व्यक्त करुन उपस्थित मान्यवर आणि उपस्थित वकील पदाधिकारी, वकील, कर्मचारी यांचे आभार मानले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली, असे ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, ईश्वर कां. सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
