सोलापूर | नुकत्याच तिसऱ्या टप्प्यात झालेल्या 42 सोलापूर लोकसभा व 43 माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदारासाठी विशेषता दिव्यांग, जेष्ठ नागरिक आजारी असलेले मतदार आणि नव युवा मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी मतदानाच्या टक्केवारी थोडीशी वाढ झालेली दिसून आली. जिल्ह्याचे वाढत असलेले तापमान पाहता प्रशासनाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यकतेप्रमाणे मतदारांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. जेणेकरून मंडपाच्या सावलीमध्ये रांगेत उभे राहून वयोवृद्ध, रुग्ण आणि महिला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई असताना देखील मतदारांना प्रशासनाकडून स्वच्छ आणि ग्लुकोज युक्त पाण्याची व्यवस्था :सध्या जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही ग्रामीण भागासह शहरातील सर्व मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांसाठी प्रशासनाकडून स्वच्छ आणि ग्लुकोज युक्त पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या सुविधेमुळे अनेक मतदार केंद्रावरील मतदारांनी समाधान व्यक्त केले.
मतदान केंद्रावर लहान बाळासहित येणाऱ्या महिला मतदारांसाठी संबंधित महिला मतदान करेपर्यंत त्यांच्या बाळासोबत खेळण्यासाठी व त्याचा सांभाळ करण्यासाठी तात्पुरते पाळणाघर उभारण्यात आले होते याची जबाबदारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांना देण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली होती ज्या ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नसेल त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली होती. मतदान केंद्र व मतदान केंद्राचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून दिनांक एक मे ते सहा मे 2024 या कालावधीत सर्व 3617 मतदान केंद्रावर अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर स्वच्छता पाहून मतदार ही मतदानाच्या रांगेत उभा राहिला तरी त्यांना कोणताही त्रास झाला नाही. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मतदान केंद्र व परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली होती.मतदान करताना एखाद्या व्यक्तीला अचानक काही आरोग्याची समस्या उद्भवली तर त्याच्यावर ताबडतोब प्राथमिक उपचार करण्याकरता प्राथमिक उपचार किट तसेच ॲम्बुलन्स ची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आली होती.
