अमरावती, 9 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सन 2021-22 वर्षातील पुरस्कार जाहीर झाले असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला राज्यस्तरावरील तीन पुरस्कार घोषित झाले आहेत. सर्वोत्कृष्ट रासेयो संचालक प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ. राजेश बुरंगे, सर्वोत्कृष्ट रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार विद्यापीठ संलग्नित श्रीमती ल. रा. तो. वाणिज्य महाविद्यालय, अकोलाचे डॉ. रतनलाल येऊल यांना व सर्वोत्कृष्ठ रासेयो स्वयंसेवक पुरस्कार शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावतीचे अभिजित काळे यांना जाहीर झाला आहे.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाज कार्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून सदर पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येतात. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरु डॉ. प्रसाद वाडेगांवकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, रा.से.यो.चे विद्यमान संचालक डॉ. निलेश कडू यांनी डॉ. राजेश बुरंगे, डॉ. रतनलाल येऊल व अभिजित काळे यांचे अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
