पुणे, 8 ऑक्टोबर : पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधांची उपलब्धता झाली आहे. मात्र सायनेज बोर्ड, टर्मिनलच्या बाहेर पडणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. या टर्मिनलवरून दररोज सुमारे १२० विमानांची उड्डाणे होणार आहेत. टर्मिनलचे उद्घाटन झाल्यानंतरच वाहतूक सुरू होईल. उद्घाटनासाठी आणखी किमान महिना लागण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा या टर्मिनलमध्ये मिळतील. टर्मिनलच्या प्रवेशद्वारावरच कोल्हापुरातील भवानी मंडप, न्यू पॅलेस यांच्या प्रतिकृती साकारण्याचे काम सुरू आहे. तसेच इमारतीच्या बाहेरील बाजूस पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असलेला शनिवार वाडा, गणेशोत्सव आदी चित्रे रेखाटली आहेत. नव्या टर्मिनलवरून प्रवास करताना प्रवाशांना मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
