ठाणे, 4 फेब्रुवारी : मोटार सायकल यांच्या धुरामधून वातावरणात पसरणाऱ्या कार्बन मोनोक्साईडमुळे श्वसनाचे विकार होतात. कोविड काळात श्वसन विकार झालेल्या व्यक्ती प्रथम बळी पडल्या होत्या. सायकलिंगमुळे आपण हे वायूचे प्रदूषण थांबवू शकतो असा मोलाचा कानमंत्र आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनचे ज्येष्ठ सायकलिस्ट, विश्व विक्रम विजेते सतीश जाधव (वय ६७ वर्षे) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिला. तसेच, प्लॅस्टिक बाटल्या, पिशव्या, खाऊचे पुडे, बिस्किटांचे रॅपर्स या वातावरणात विघटन न होणाऱ्या वस्तूंमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल बिघडतो आहे. या प्लॅस्टिक वस्तूंचे नियोजन कसे करायचे याचे उपाय देखील समजावून सांगितले.
बी.एन. बांदोडकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे शनिवारी क्रिडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुप्रसिद्ध सायकलिस्ट जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायकलिंग आणि प्रदूषणमुक्त भारत या संकल्पनेबद्दल मार्गदर्शन केले. सायकलद्वारे भारत भ्रमंती करत भारतात ६५ हजार किमी सायकल चालवली. लडाखमध्ये प्लॅस्टिक कचरा टाकू नका, पाणी वाचवा ही मोहीम राबविली इतकेच नव्हे तर आदी कैलास आणि ओम् पर्वत येथे वयाच्या ६५ व्या वर्षी सोलो सायकलिंग करत विश्वविक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. नुकतीच त्यांनी भारताच्या ईशान्य भागात दोन महिने सायकलिंग करून त्या भागातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत प्रबोधन असल्याचे ते म्हणाले. ७२ वर्षीय सायकलपटू आणि माजी पोलीस अधिकारी प्रविणकुमार कुलथे यांनी दिवसाला २५० किमी सायकल चालविल्याचे सांगितले आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे यांनी सायकलिंगमध्ये महिलांचे प्रमाण वाढले पाहिजे. महिला या स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मानसीक आणि शारिरीक आरोग्य फिट राहण्यासाठी सायकलिंग हा उत्तम आणि स्वस्त पर्याय असल्याचे सांगितले. तसेच, सायकल आणि शिक्षण यांना एकत्र जोडणारा सायक्लोएज्यु हा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात राबविणारी आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशन ही संस्था होती अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी संस्थेचे सदस्य होण्याचे आवाहन प्रा. सुनील भुसारा यांनी आपल्या सुत्रसंचालनातून केले.
