* रोटरी क्लब आणि नॅशनल बर्न्स सेंटरच्या संयुक्त उपक्रमाचा अधिकाधिक जणांना लाभ घेण्याचे आवाहन
मुंबई, – रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ देवनार यांनी नॅशनल बर्न्स सेंटरच्या सहकार्याने बर्न सर्व्हायव्हर्समधील विकृती सुधारण्यासाठी मोफत सुधारणात्मक शस्त्रक्रिया शिबिरांच्या जागृतीसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्यांना ही शस्त्रक्रिया परवडत नाही अशा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या व गंभीर भाजलेल्या व्यक्तींसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराबाबत जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याप्रसंगी नॅशनल बर्न्स सेंटरचे वैद्यकीय संचालक डॉ सुनील केसवानी, रोटरी क्लब देवनार अध्यक्ष संगिता सहानी, रोटरी क्लब बॉम्बे उत्तरचे सदस्य हेमेंद्र शाह, रोटरी क्लब बॉम्बे उत्तरचे सदस्य मेहुल शाह आदी मान्यवर उपस्थित होते.
नॅशनल बर्न्स सेंटर या प्रत्येक शिबिरासाठी कोणत्याही खर्चाशिवाय हॉस्पिटलची जागा, ऑपरेशन थिएटर, शस्त्रक्रिया उपकरणे, ऑपरेटिव्ह मशिनरी, हॉस्पिटलचे वॉर्ड, सर्जन, डॉक्टर, परिचारिका आणि पॅरामेडिकल कर्मचारी यांची सेवा उपलब्ध करून देत आहे. रोटरी क्लब शस्त्रक्रिया शिबिरांच्या माध्यमातून खर्चासहित (उपभोग्य वस्तू आणि औषधांचे शुल्क) यांना मदत करून जळालेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन देखील केले जाते. शिबिरात मान, हात, कोपर, पायाची चिकटलेली बोटे आणि वेब स्पेस कॉन्ट्रॅक्चरचा समावेश आहे. याव्यतिरिक्त शस्त्रक्रियेनंतर, नियमित ड्रेसिंग, वेदना व्यवस्थापन आणि फिजिओथेरपी यासारख्या फॉलोअप उपचारांचा समावेश आहे.
शस्त्रक्रियेसोबतच सर्वसमावेशक पुनर्वसनाचाही समावेश
या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. एस.एम. केसवानी म्हणाले की, “आमच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी एकावेळी शिबिरामध्ये सरासरी २० ते २४ जणांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. येथे केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर सर्वसमावेशक पुनर्वसन, फिजिओथेरपी, व्यावसायिक थेरपी आणि डाग व्यवस्थापनाचाही फायदा होतो. जळलेल्यांना पुनर्संचयित करण्याचा आणि बरे करण्याचा हा प्रभावी प्रवास सुरू ठेवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. प्रत्येक भाजलेल्या व्यक्तीला त्यांना आवश्यक असलेली काळजी आणि सहाय्य मिळेल याची खात्री करून या संस्था सतत समर्थन पुरवण्यासाठी समर्पित आहे असेही ते म्हणाले. यावेळी काही गंभीर भाजलेल्या महिला रुग्ण तसेच लहान मुले उपस्थित होती. यावेळी त्यांनी आपले अनुभव कथन केले.
देशभरात रुग्णालयांचे जाळे आणि सुविधा वाढवण्याची आवश्यकता
याशिवाय यासाठी सरकारने देखील मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन भाजलेल्या व्यक्तींवर उपचार करण्यासाठी देशभरात रुग्णालयांचे जाळे आणि सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मात्र अॅसिडने भाजलेल्या आणि जळालेल्या व्यक्तींचे देशात प्रमाण अत्यल्प असले तरी त्यांच्याकडे सरकारचे विशेष लक्ष दिसून येते. पण इतर कुठे लागत असलेल्या आगीतून भाजलेल्या लोकांचे प्रमाण यापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे तरीही त्यांच्यासाठी सुविधा वाढवण्याचा मानस दुर्दैवाने कमी दिसून येत असल्याचे डॉ. केसवानी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
