मुंबई, 23 जुलै (हिं.स.)। भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात मंगळवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना टळली. ओमेगा हायस्कूलच्या मागील टेकडीवरून सुमारे ५० फूट उंचीची दरड कोसळली असून संरक्षक भिंतीसह पाच घरे खाली आली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड कोसळण्याआधीच घरांना धोक्याची सूचना देऊन तातडीने रिकामे करण्यात आले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. मुसळधार पावसामुळे टेकडीवरील संरक्षक भिंतीला तडे गेल्याने भिंतीसह तीलगतची घरे कोसळली. काही स्थानिकांनी या घटनेचा थरार मोबाईलमध्ये कैद केला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने परिसरातील उर्वरित घरे रिकामी करत बचावकार्य सुरू केले. सध्या या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर उतारांवर वसलेल्या वस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.
मुंबईच्या डोंगर उतारांवर अनेक झोपडपट्ट्या अनधिकृतपणे वसवण्यात आल्या आहेत. कुर्ला, कांदिवली, दहिसर, मुलुंड, मालाड यासारख्या भागांमध्ये अशा वस्त्यांची संख्या मोठी आहे. भांडुपमधील घटनेनंतर या धोकादायक झोपड्यांविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला असून, स्थानिकांनी प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
