काँग्रेसकडून सावरकरांचा पुतळा जाळल्याचा निषेध
नागपूर, 02 फेब्रुवारी : काँग्रेसकडून गुरुवारी नागपूर विद्यापीठासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या निंदनीय घटनेच्या विरोधात आज, शुक्रवारी भाजपा युवा मोर्चाने विद्यापीठात आंदोलन करून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल नितीन राऊत यांचा निषेध नोंदवला.
भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडेंच्या मार्गदर्शनात आणि नागपूर भाजपचे संघटन महामंत्री विष्णू चांगदे यांच्या प्रमुख उपस्थितीत, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे कुलगुरू उपस्थित नसल्याकारणाने प्र कुलगुरू यांना घेराव घालून निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी प्र कुलगुरू यांच्या केबिनमध्ये जाऊन नारेनिर्देश करण्यात आले तसेच त्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत विद्यापीठातर्फे तक्रार करण्यात आली नाही तोपर्यंत युवा मोर्चाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी तिथे ठिय्या आंदोलन केले. यावेळी कुलगुरूंनी अंबाझरी पोलीस स्टेशन येथे फोन करून कुणाल राऊत यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली व तसेच एक लेखी पत्र लिहून ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर वाचून दाखवले व ते अंबाझरी पोलीस स्टेशन येथे पाठविण्यात आले. तसेच काँग्रेसने जिथे सावरकरांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला तिथेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कुणाल राऊतचा निषेध व्यक्त करण्यात आला व प्र कुलगुरूंना सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली.
