सोलापूर 4 नोव्हेंबर ( हिं.स) : संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले असून त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटल्यानंतर शासन खडबडून जागे झाले आहे. दुसरीकडे गावागावांमधील अभ्यासकांनी जुन्या दप्तरांची पडताळणी सुरू केली असून या पडताळणीमध्ये भोसे (ता. पंढरपूर) येथे कुणबी जातीचे पुरावे आढळून आले आहेत.
मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला बळ मिळावे यासाठी गावोगावी शांततेच्या मार्गाने उपोषणे सुरू आहेत. तसेच कुणबी जातीच्या प्रमाणपत्रांचा अभ्यासही सुरू आहे. भोसे (ता. पंढरपूर) येथील इतिहास संशोधक प्रा. महादेव तळेकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील (पूर्वीचे लोकल बोर्ड) दप्तर तपासले असता त्यांना १४ लोकांच्या नावापुढे मराठी भाषेत कुणबी जातीची नोंद असल्याचे आढळून आले.
हिंदुस्थान समाचार
