नाशिक, 4 नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिकच्या अमली पदार्थविरोधी पथक व गुन्हे शाखा युनिट – १ च्या पथकाने सोलापूर येथील औद्योगिक वसाहतीत धाड टाकून मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-१ व एन. डी. पी. एस. च्या विशेष टास्क फोर्सने सोलापूरमध्ये काल (३ नोव्हेंबर) दुसऱ्यांदा धाड टाकून तेथील अमली पदार्थांचे गोदाम उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे १ हजार ५० लिटर केमिकल व दीडशे ते दोनशे किलो पावडरसह सुमारे ३५ लाखांचा मुद्देमाल या विशेष टास्क फोर्सच्या पथकाने जप्त केला आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सामनगाव एम. डी. प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापूरमध्ये सुरू केलेला हा कारखाना आठ दिवसांपूर्वी उद्ध्वस्त केला होता. या प्रकरणात नाशिकच्या मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी दि. २८ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून सनीच्या सांगण्यावरून २० हजार रुपये दरमहा नफ्यासाठी कारखान्याचा कायदेशीर करार केला होता, अशी माहिती मिळाली. त्याआधारे गुरुवारी वैजनाथ आवळे याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली असता आवळेने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा लाखो रुपयांचा कच्चा माल एका गोदामात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विशेष टास्क फोर्सचे पथक सोलापूर तालुक्यातील कोडी या गावातील गोदामातून लाखो रुपयांचा कच्चा माल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव , सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष टास्क फोर्सचे प्रमुख विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने केली.
हिंदुस्थान समाचार
