अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.):शासन परिपत्रकानुसार मजूर कामगार सहकारी संस्थांना एका वर्षात १ कोटी रुपयांपर्यंतचे कामे करण्याचे आदेश आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील कित्येक मजूर संस्था हे एका वर्षात ४ कोटी रुपयांपर्यंत बांधकामांचे विविध कंत्राट नियमबाह्यरित्या जिल्हा उपनिबंधक विभागाच्या आशीर्वादाने घेत असल्यामुळे शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केल्या जात आहे. १ ते ४ कोटी रुपयांपर्यंतची कामे करणाऱ्या मजूर संस्थेतील पदाधिकारी खऱ्या मजुरांचे नावे मजुरी व्हाउचरवर खोट्या सह्या करून हजारो रुपयांची मजुरी हडप करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.अमरावती जिल्ह्यात ११७ मजूर कामगार संस्थांची नोंद आहे. त्यात फक्त ५० संस्था कार्यरत असून त्यातही काही मजूर संस्था कागदोपत्री तयार केल्या आहेत. कित्येक सभासदांना आपण संस्थेत आहे किंवा नाही, हेसुद्धा माहिती नाही. त्यांना संस्थेत सभासद म्हणून कागदोपत्री दाखविले जात आहे. जिल्ह्यात कार्यरत ५० मजूर संस्थांची बँक पासबुक व कामे वाटप बुक मेंटेन करण्याची जबाबदारी तालुक्यासह जिल्हा उपनिबंधकांची असते. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून मजूर संस्थांना जास्त जवळपास ४ कोटी रुपयांचे कंत्राट नियमबाह्यरित्या दिल्या जात आहे. यामध्ये जिल्हा निबंधक विभागात कामे वाटपात मोठ्या प्रमाणात कमिशनसुद्धा घेतल्या जात असल्याची चर्चा आहे. संस्थेला मिळालेल्या कोट्यवधींच्या प्रत्येक कामांवर संस्थेचे मजूर असणे आवश्यक आहे. मात्र, कामांवर संस्थेचे एकही मजूर नसतानाही त्यांचे नावे हजारो रुपयांची मजुरी काढल्या जात आहे. कामावर संस्थेचे मजूर आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी संबंधित कामांचे शाखा व उपविभागीय अभियंता यांची असते. तसेच मस्टरवर त्यांच्या नावाची नोंद घेऊन मजुरी वाटप करण्याचे कार्य केले जाते. मात्र, अशा कोणत्याही नियमांची अंमलबजावणी कुठेही होत नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
‘त्या’ मजुरांचे आलिशान बंगले, खरे मजूर झोपडीत?
तालुका व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मजूर कामगार सहकारी संस्थेत मजूर सभासद म्हणून नोंद असलेल्या मजुरांकडे अलिशान बंगले, महागड्या कार दिसून येत आहे आणि आजही ते गर्भश्रीमंत मजूर शासनदप्तरी मजूर म्हणून संस्थेत कागदोपत्री कार्यरत आहे. मात्र, खरे मजूर आजही मजुरीपासून वंचित राहून झोपडीत राहत आहे. अशा गंभीर प्रकाराची सहकार सचिवांनी दखल घेऊन चौकशीची मागणी जोर धरत आहे.
हिंदुस्थान समाचार
