रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : परसबागा सक्षम होण्याची गरज असून शालेय जीवनापासूनच त्याविषयी मुलांमध्ये आवड निर्माण झाली, तर त्या नक्कीच सक्षम होतील, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते यांनी केले.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दापोली तालुक्यातील कोळबांद्रे क्र. १ जिल्हा परिषद आदर्श शाळेने तालुकांतर्गत परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यावेळी स्पर्धेच्या परीक्षणानंतर त्या बोलत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने मूल्यांकन करण्यासाठी शाळेला भेट दिली. त्यांच्या समवेत दापोलीचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, दापोली शालेय पोषण आहार अधीक्षक दापोली बीटचे विस्तार अधिकारी पद्मन लहांगे, विस्तार अधिकारी संजय दरेकर, परीक्षण समिती सदस्या विस्तार अधिकारी श्रीमती हिरवे आणि खापरे तसेच कोळबांद्रे केंद्रप्रमुख संजय मेहता उपस्थित होते.
यावेळी शिरभाते यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना परसबाग संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी परसबागेविषयी विचारलेल्या प्रश्नांची मुलांनी उत्तरे दिली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी परसबागेची पाहणी केली. मुलांनी विविध भाज्यांमधून मिळणारी पोषक तत्त्वे आणि आरोग्यविषयी होणारे उपयोग सांगितले. परसबाग आणि शालेय परिसर तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचे मिळणारे सहकार्य याबद्दल श्रीमती शिरभाते यांनी विशेष आभार मानले. शाळेतील सर्व शिक्षक तसेच केंद्रप्रमुख संजय मेहता यांचेही विशेष कौतुक केले.
हिंदुस्थान समाचार
