अमरावती, २ जानेवारी, (हिं.स) ”हर घर सावरकर” समिती पुणे यांच्या वतीने पुण्यात आगामी सहा ते सात जानेवारी दरम्यान होणाऱ्या वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेकरिता प्रखर वक्ता, लेखक, युवा पत्रकार शुभम बायस्कार यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रमधून काही मोजक्या वक्त्यांची परीक्षा व प्रात्यक्षिकाद्वारे निवड करण्यात आली. त्यामध्ये अमरावतीतून शुभम बायस्कार यांचा समावेश आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विचार समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ”हरघर सावरकर” समितीमार्फत विशेष अभियान राबविले जात आहे. या अभियानाला महाराष्ट्र शासनाचे विशेष सहकार्य मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ”हरघर सावरकर” समिती कार्यरत आहे. त्या अंतर्गत आगामी सहा ते सात जानेवारीला पुण्यात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा होत आहे. या विशेष कार्यशाळेकरिता महाराष्ट्रातून काही मोजक्या वक्त्यांची निवड करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित परीक्षा, त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या विविध पुस्तकांचे वाचन अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यात आयोजकांच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष ज्ञानाची चाचपणी करण्यासाठी आयोजकांच्या वतीने सावरकर यांच्या जीवनावर आधारित तीन मिनिटांची भाषणाची क्लिप मागविण्यात आली होती. या दोन्ही स्तरांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या वक्तांची निवड राज्यस्तरीय प्रशिक्षणाकरिता करण्यात आली आहे. यामध्ये अमरावतीतून युवा पत्रकार शुभम बायस्कार यांची निवड झाली आहे. सहा ते सात जानेवारी दरम्यान पुण्यात होत असलेल्या या कार्यशाळेला महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिक, विचारवंत, लेखक उपस्थित राहणार आहेत. बायस्कार यांच्या निवडीबद्दल राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
हिंदुस्थान समाचार
