लातूर, 27 जानेवारी, (हिं.स.)। ज्या विभागावर तालुक्याच्या पिढी घडवण्याची जबाबदारी आहे, तोच देवणी पंचायत समितीचा शिक्षण विभाग सध्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या ‘प्रसादा’मुळे चर्चेत आला आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय शिंदाळकर यांनी पदभार घेतल्यापासून शिक्षणाऐवजी ‘नियोजना’तच जास्त रस दाखवल्याने अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने आता त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.
भ्रष्टाचाराची ‘चव’ खिचडीत?
शालेय पोषण आहारासारख्या संवेदनशील विषयातील निधीत अनियमितता झाल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. काही निवडक मुख्याध्यापकांना हाताशी धरून हा ‘अर्थपूर्ण’ कारभार सुरू असल्याची चर्चा जनमानसात आहे. विशेष म्हणजे, तक्रार घेऊन जाणाऱ्या पालकांना सन्मानाऐवजी अधिकाऱ्यांच्या उर्मट भाषेचा सामना करावा लागत आहे.
अकार्यक्षमतेचा कळस :
कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिले जात असल्यामुळे जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता धोक्यात आली आहे. फोन न उचलणे, कार्यालयात दांड्या मारणे आणि शैक्षणिक प्रश्नांकडे डोळेझाक करणे यामुळे शिक्षण विभागाचा कारभार रामभरोसे चालला आहे.
आंदोलनाचा इशारा :
सौदागर मोहम्मदरफी यांच्या नेतृत्वाखालील समितीने आता थेट पुणे शिक्षण संचालनालयावर धडक देण्याचे ठरवले आहे. जोपर्यंत कायमस्वरूपी सक्षम अधिकारी मिळत नाही आणि शिंदाळकरांच्या कार्यकाळाचे ऑडिट होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis
