रत्नागिरी, 14 जुलै, (हिं. स.) : धामणसे (ता. रत्नागिरी) येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबवण्यात येत आहे. याअंतर्गत १६ जुलै रोजी नेत्रतपासणी आणि वृक्षवाटप अशा दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदाबाद येथील जोशी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल (JTI) ही संस्था आणि रत्नागिरीतील नंदादीप नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून प्रथम येणाऱ्या १५० लोकांना वाचनासाठी मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. हे शिबिर ग्रंथालयाच्या कै. डी. एम. जोशी सभागृहात सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.
दुसऱ्या उपक्रमात एक झाड आईच्या नावाने २.० या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वृक्षवाटप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात काजू, बेल, चिंच, आवळा, सोनचाफा, पेरू, खैर, साग व कडू निंब या प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या रोपांचे ग्रंथालय प्रांगणात सकाळी ११ वाजता मोफत वाटप करण्यात येणार आहे.
नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन धामणसे सरपंच अमर रहाटे यांच्या हस्ते व एक झाड आईच्या नावाने अंतर्गत वृक्ष वाटप रत्नेश्वर ग्रंथालयाचे अध्यक्ष उमेश कुळकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी सरपंच विलास पांचाळ, चिटणीस मुकुंद गणेश तथा बाळासाहेब जोशी, संचालक उपसरपंच अनंत जाधव, विश्वास धनावडे, प्रशांत रहाटे व सौ. स्मिता कुळकर्णी उपस्थित राहणार आहेत.
हितचिंतक, वाचनप्रेमी, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन्ही कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नेश्वर ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी, ग्रंथपाल केशव कुळकर्णी व लिपिक अविनाश लोगडे यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी
