सातारा, 5 जानेवारी (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यातील विविध संस्कृतीचे अदान-प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला व संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञान अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात जानेवारी अखेरीस सलग 5 दिवस महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. वाई, फलटण, कराड, सातारा अशा विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मर्दानी खेळ, लहान मुलांचे ऐतिहासिक घटनांवरील कार्यक्रम, महिला बचतगटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, हस्तकला दालने, ऐतिहासिक शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, सातारा जिल्ह्याचा शौर्य आणि संस्कृतीचा वैभवी वारसा सांगणारे कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या गडकिल्यांची माहिती देणारे कार्यक्रम वाई, फलटण, कराड, सातारा आदी विविध ठिकाणी घेण्यात येणार आहेत. सातारा जिल्ह्याला लाभलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, जिल्ह्याचा झालेला विकास, पर्यटन या सर्व बाबींचे महत्त्व अधोरेखित करणारा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. सदरचा महासंस्कृती महोत्सव यशस्वी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोर नियोजन करावे. आणि जिल्ह्याचा वारसा ठळकपणे अधोरेखित करणारा महासंस्कृती महोत्सव यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
या कालावधीत जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, सांस्कृतिक ठिकाणे, कोयनाधरण आदी महत्वपूर्ण, वैशिष्टपूर्ण ठिकाणी विद्युत रोशनाई करण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
हिंदुस्थान समाचार
