नाशिक ( प्रतिनिधी) आद्य शंकराचार्य यांच्या परंपरेतील दक्षिणाम्नाय श्री शारदा पीठाधीश्वर स्थापित श्री शृंगेरी शारदा पिठाच्या पंचवटीतील मठामध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. दि.२४ पर्यंत दररोज होमहवन, पूजन, आरती व महाप्रसाद वितरण केले जाईल. विविध धार्मिक कार्यक्रम होतील अशी माहिती मठाचे व्यवस्थापक रामगोपाल अय्यर यांनी दिली.
पंचवटीत काळाराम मंदिर मार्गावर सरदार चौकाजवळ शृंगेरी शंकराचार्य मठ आहे. तेथे जगद्गुरू दक्षिणाम्नाय शारदापीठाधीश्वर श्री भारतीतीर्थ महास्वामीजी व श्री विधुशेखर भारती महास्वामीजी यांच्या प्रेरणेने दरवर्षी विविध सण – उत्सव साजरे करण्यात येतात. शारदीय नवरात्रौत्सवाला विशेष महत्व आहे. या उत्सवात दररोज सकाळी सप्तशती पारायण, कुंकूमार्चन, सुवासिनी व कुमारिका पूजन, मंगलआरती होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद वितरण केले जाईल. तसेच सायंकाळी सहस्रनामार्चन, त्रिशदी अर्चना, देवी वंदन, अष्टावधान सेवा, देवी आराधना व मंगल आरती होईल. रात्री ८.३० वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
शनिवारी (दि.१४) श्री शारदा देवीमहाअभिषेक व ३४ वे पिठाधिश्वर श्री चंद्रशेखर भारती स्वामी यांची आराधना करण्यात आली. काल रविवारी ( दि.१५) घटस्थापनेला नवरात्री स्थापना संकल्प करण्यात आला. गुरुवारी ( दि.१९) श्री ललिता हवन, शुक्रवारी ( दि.२०) सरस्वती आवाहन, रविवारी ( दि.२२) दुर्गाष्टमी पूजन, सोमवारी ( दि.२३) चण्डि हवन, सप्तशती पारायण सांगता होईल. मंगळवारी (दि.२४) विजयादशमी पूजन केले जाईल. भाविकांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन, पूजन, महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
