सोलापूर 7 ऑक्टोबर ( हिं.स) गेल्या काही वर्षांत कृषी सिंचनाच्या क्षेत्रात कर्नाटकने कात टाकली आहे. आता कालव्याद्वारे पाणी वाटपासाठी स्काडा ॲटोमॅटिक सिस्टीमचा वापर करीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. या यंत्रणेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण कालवा क्षेत्रावर पाटबंधारे प्रशासनाला नजर ठेवता येत आहे. नियंत्रण कक्षातूनच कालव्याचे गेट उघडता – बंद करता येते.शिवाय मागणीनुसार ठरवल्याइतकेच पाणी सोडता येत असल्याने पाण्याच्या गैरवापराला आळा बसला आहे. तसेच कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत (टेल एंड) पाणी पोचत आहे. परिणामी पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर झाल्या आहे. त्याचबरोबर पाण्यासाठी कालवा फोडाफोडीतून होणारे तंटेही थांबले आहेत. मात्र, पुढारलेल्या महाराष्ट्रात यावर अद्याप केवळ विचारविनिमयच सुरू आहे. दरम्यान, या राज्यात असा पॅटर्न राबविण्याची गरज आहे.गेल्या काही वर्षांत भीमा, कृष्णा नदीवरील बंधारे, तलाव भरण्याच्या योजना यामुळे कर्नाटकातील सीमाभागातील कृषी सिंचनाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कालव्यावर लक्ष ठेवता येणाऱ्या आणि रिमोटद्वारे नियंत्रित करता येणाऱ्या स्काडा प्राणलीद्वारे पाणी वाटपात शिस्त आणली आहे.
हिंदुस्थान समाचार
