नांदेड, 23 जानेवारी (हिं.स.)।
धर्माबाद येथील नगरपरिषदेच्या विषय समिती व
सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत मराठवाडा जनहित पार्टीच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली.
मराठवाडा जनहित पार्टीचे १५ नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून आले असून भाजपाचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. मराठवाडा जनहित पार्टीकडे स्पष्ट बहुमत असल्याने विषय समिती व सभापती पदांची निवडणूक बिनविरोध पार पडली.
निवडणूक निर्णय अधिकारी इरलोड तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, घाटीकर व गोविंद जक्केवाड यांनी कामकाज पाहिले. कोणाला कोणते सभापतिपद मिळणार याबाबत उत्सुकता होती. मात्र पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष शंकर बोल्लमवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती मोईजोद्दीन करखेलीकर व माजी सैनिक शेषेराव फडसे यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सभापती पदांचे वाटप केले. सर्व नवनिर्वाचित सभापतींचे नगराध्यक्षा संगीताताई बोल्लमवाड यांनी स्वागत केले.
उपनगराध्यक्ष महेश बोल्लमवाड यांच्याकडे पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियोजन व विकास सभापती कृष्णा तिम्मापुरे, बांधकाम सभापती अहेमद माजीद उर्फ समीर, स्वच्छता व आरोग्य सभापती अलीमोद्दीन चौधरी, शिक्षण सभापती अर्चना संगमवार (बिपटवार), महिला व बालकल्याण सभापती अनुसया सुरकूटवार, उपसभापती कविता हनमंते यांची निवड करण्यात आली.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
