नवी दिल्ली, 23 जानेवारी (हिं.स.)। आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी चौफेर विक्रीच्या दबावामुळे शेअर बाजार घसरणीसह लाल निशाणावर बंद झाला. सेन्सेक्स सुमारे 770 अंकांनी घसरला, तर निफ्टीत 241 अंकांची घसरण नोंदवण्यात आली.
कारोबाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चा सेन्सेक्स 769.66 अंक म्हणजेच 0.94 टक्क्यांनी घसरून 81,537.70 या स्तरावर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)चा निफ्टीही 241.25 अंक म्हणजेच 0.95 टक्क्यांनी घसरून 25,048.65 या स्तरावर बंद झाला.
शेअर बाजारात सर्वत्र विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आणि सर्वच क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणात राहिले. बँकिंग, रिअल्टी, आरोग्य, तेल व वायू, ऑटो, वित्त आणि मीडिया क्षेत्रांवर अधिक दबाव दिसून आला.
सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्सचा शेअर 7.5 टक्क्यांहून अधिक घसरला. इटरनलमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त, तर इंडिगोमध्ये चार टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ॲक्सिस बँक, बजाज फिनसर्व आणि पॉवर ग्रिडचे शेअर्स दोन ते तीन टक्क्यांच्या दरम्यान घसरले.
याशिवाय मारुती सुझुकी, बीईएल, स्टेट बँक ऑफ इंडिया, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एल अँड टी, ट्रेंट आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एक ते दोन टक्क्यांदरम्यान घसरण झाली. टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि आयटीसीचे शेअर्सही लाल निशाणात राहिले. हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर जवळपास एक टक्का वाढीसह बंद झाला. टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स आणि टीसीएसमध्येही तेजी दिसून आली.
याआधी गुरुवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)चा सेन्सेक्स 397.73 अंक म्हणजेच 0.49 टक्क्यांनी वाढून 82,307.37 या स्तरावर बंद झाला होता. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई)चा निफ्टीही 132.40 अंक म्हणजेच 0.53 टक्क्यांनी वाढून 25,289.90 या स्तरावर बंद झाला होता.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
