-जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हा टीबी फोरम समितीचा आढावा
चंद्रपूर 21 नोव्हेंबर (हिं.स.) – क्षयरोग दूर करण्यासाठी समाजात असलेले क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणणे व या रोगाचा संसर्ग कमी करणे हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने संशयित क्षयरुग्ण शोधून त्यांना नियमित औषधोपचाराखाली आणावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले.
जिल्हा टिबी फोरम समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. वीस कलमी सभागृहात आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहूलकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जास्तीत जास्त संशयित क्षयरुग्णांना शोधून त्यांचे निदान करण्यासाठी तपासणी करावी व क्षयरुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचाराखाली आणून बरे करावे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधमोहिम जिल्हयामध्ये 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान ग्रामीण भागातील 100 टक्के आणि शहरी भागातील 20 टक्के लोकसंख्येची तपासणी घरोघरी जाऊन आरोग्य चमुमार्फत करण्यात येणार आहे. आरोग्य चमू घरी आल्यास नागरीकांनी कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण तपासणीसाठी सहकार्य करावे तसेच निदान करून उपचार घ्यावेत.
टीबी फोरम समितीचे उद्देश : लोकसहभागातून व क्षयरुग्णांच्या दृष्टीकोनातून क्षयरोग प्रतिसाद मजबूत करणे, क्षयरोगाने ग्रस्त लोकांचे नेटवर्क बनवुन त्यांच्या माध्यमातून टिबी कार्यक्रमात समुदायांचा सहभाग वाढविणे, क्षयरोगाप्रती समाजामध्ये भेदभाव दूर करणे व त्यांना शासकीय सोयी व सेवा उपलब्ध करून देणे तसेच समाजामधून क्षयरोगाचे दूरीकरण करून समाज क्षयमुक्त करणे हा टीबी फोरम समितीचा उद्देश आहे.
हिंदुस्थान समाचार
