रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : दिवाळीचे औचित्य साधून उदय सामंत फाउंडेशनतर्फे महेश सामंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील दामले विद्यालयात इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यातील सहभागी रांगोळी कलाकारांचा सन्मान पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. प्रदर्शनाला रत्नागिरीकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
जिल्ह्यातील आणि राज्यातील १९ दिग्गज रांगोळीकारांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. त्यामध्ये इस्लामपूरचे अभिजित शिवाजी सूर्यवंशी, रत्नागिरीचे निखिल नीलेश कांबळे, वेंगुर्ल्याचे तेजस मंगेश गोसावी, रत्नागिरीचे गौरव रमेश सुर्वे, साई दीपक सनगरे, खेड येथील कौस्तुभ नरसिंह सुतार, राहुल संतोष सुतार, पुण्याचे योगेश चंद्रकांत पाटील, दापोलीचे प्रवीण यशवंत वेळनसकर, इस्लामपूरचे सचिन नरेंद्र अवसरे, कुडाळ येथील केदार सखाराम टेमकर, देवरूखचे रोहित राजू कोकरे, अक्षय शिवाजी वहाळकर, विलास विजय रहाटे, दापोलीचे गुरुप्रसाद पांडुरंग देवधरकर, मालगुंडचे राहुल दत्ताराम कळंबटे, उमरे (रत्नागिरी) येथील राज दत्ताराम कांबळे, रत्नागिरीची समिधा समीर रसाळ, पावसचे अजय प्रकाश पारकर यांचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, राजकारणाचा स्पर्श न करता उदय सामंत फाउंडेशन नावारूपाला येईल असा शब्द मला दिला होता. त्यानुसार समाजोपयोगी काम उदय सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात आहे, याचा मला अभिमान आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रामधील रांगोळी कलाकारांना राज्यात व्यासपीठ मिळवून दिले जाईल. मेहनतीमागे इच्छाशक्ती असणे गरजेचे असल्याचे सांगत पालकमंत्री उदयजी सामंत यांनी रांगोळी कलाकारांचे कौतुक केले. रत्नागिरीच्या इंद्रधनु रांगोळी प्रदर्शन स्पर्धेचा पॅटर्न महाराष्ट्रात राबवणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ रांगोळीकार कृष्णा जाधव, प्रसन्नशेठ आंबुलकर, रांगोळीकार प्रशांत राजिवले, सुनील ऊर्फ दादा वणजू, राजेश सोहोनी, उदय गोखले, राहुल कळंबटे, सिद्धेश वैद्य, पालिकेचे मुख्यअधिकारी तुषार बाबर, शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदय सामंत फाउंडेशनचे महेश सामंत आणि त्यांचे सहकारी सिद्धेश वैद्य, रजनीश परब, प्रथमेश साळवी, पूर्वा पेठे, विद्या विचारे, मानसी साळुंखे, समीर इंदुलकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
हिंदुस्थान समाचार
