पुणे, 26 नोव्हेंबर (हिं.स.)। नवले पुलावर होणारे अपघात रोखण्याबरोबरच जड वाहनांची वाहतूक वळविण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ आणि ‘पीएमआरडीए’ यांच्या रिगरोडच्या पर्यायांची जिल्हा प्रशासनाने पाहणी केली. त्यात ‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडचा पर्याय पुढे आला आहे.जांभूळवाडी येथून थेट पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे स्टेडियमदरम्यान रस्त्यांचे काम केल्यास नवले पुलाला पर्याय निघू शकतो, यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे. त्यावर दोन दिवसांत बैठक घेऊन काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
नवले पुलाजवळ दहा दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सरकारच्या विविध विभागांकडून तातडीने उपयोजना करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर जिल्हा प्रशासनाने रिंगरोडचा पर्याय पुढे आणला आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पुणे जिल्ह्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) अंतर्गत वर्तुळाकार महामार्ग (इनर रिंगरोड), तर एमएसआरडीसीकडून बाह्य वर्तुळाकार महामार्गाचे (आउटर रिंगरोड) काम हाती घेण्यात आले आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
