बेंगळुरू, 25 डिसेंबर (हिं.स.) : आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘एनडीए’मध्ये फूट पडेल, असा दावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना डीके शिवकुमार यांनी हा दावा केलाय.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी म्हटले होते की, विरोधी पक्षांची कोणतीही समान विचारधारा नाही. विरोधकांची आयएनडीआयए आघाडी नावापुरतीच आहे. ही आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांचा समूह आहे. यांच्यात वैचारिक मतभेद असून प्रत्येक पक्षाचा वेगळा एजेंडा आहे. आयएनडीआयए आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची हताशा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दाखवून दिल्याचा टोला देखील ठाकूर यांनी लगावला होता. केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या या आरोपांबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीत फूट पडलेली असेल. ते (एनडीए) आमचा (आयएनडीआयए) निवडणुकीत सामना करू शकणार नाहीत.
हिंदुस्थान समाचार
