नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय सैन्यात मेजरच्या पदावर असलेला अधिकारी राष्ट्रीय सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी थेट कारवाई करत त्याला सैन्य सेवेतून बडतर्फ केले आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार आरोपी मेजर स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमध्ये (एसएफसी) तैनात होता. संवेदनशील माहिती उघड करण्यामध्ये मेजरचा सहभाग असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर आले होते. त्यानंतर सैन्याने मार्च 2022 मध्ये मेजरच्या या कृत्यांची चौकशी सुरू केली होती.राष्ट्रपतींनी लष्कर कायदा, 1950 अंतर्गत अधिकारांचा वापर करताना मेजरच्या सेवा समाप्त करण्याच्या आदेशावर गेल्या आठवड्यात स्वाक्षरी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मेजरच्या सेवा समाप्तीची ऑर्डर सप्टेंबरच्या मध्यात जारी करण्यात आली होती आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर यावर शिक्केमोर्तब करण्यात आले.हे प्रकरण घडले त्यावेळी मेजर उत्तर भारतातील एका ठिकाणी एसएफसी युनिटमध्ये तैनात होता. हे उघड झाले की, मेजरचे सोशल मीडियावर एका ऑपरेटिव्हशी संबंध होते जो पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी काम करत होता.
आरोपी मेजरवर देशातील प्रमुख व्यक्तींबाबतची गुप्त माहिती बाळगणे आणि ती अनधिकृत व्यक्तींना पुरवणे यासह हेरगिरीमध्ये संभाव्य सहभागाचे आरोप आहेत. मेजरच्या फोनमध्ये गोपनीय माहिती आढळून आली आहे. हा प्रकार म्हणजे निर्धारित सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. राष्ट्रीय सुरक्षा प्रोटोकॉलच्या संभाव्य उल्लंघनासाठी ब्रिगेडियर दर्जाच्या अधिकाऱ्यासह सुमारे दीड डझन संरक्षण कर्मचाऱ्यांची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. हा मेजर ‘पटियाला पेग’ नावाच्या व्हॉट्सऍप ग्रुपचा भाग असल्याचे आढळून आले. लष्कराच्या सोशल मीडिया धोरणांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ब्रिगेडियरसह किमान काही अधिका-यांवर पुढील काही आठवड्यांत शिस्तभंगाची कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
