मुंबई, 09 फेब्रुवारी (हिं.स.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक आकाशदीप सिंग याला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. पंजाबचा रहिवासी असलेल्या आकाशदीपला न्यायालयाने स्थानिक जामीनदाराच्या अटीवर हा जामीन मंजूर केला. तसेच, महाराष्ट्रातच राहण्याचे आणि दर दुसऱ्या सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कुख्यात गुंड फरार अनमोल बिश्नोईने आपल्या संघटित टोळीद्वारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातर्गंत (मोक्का) गुन्हे शाखेने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यानुसार, अनमोल बिश्नोईने आपल्या संघटित गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसह, दहशतवाद आणि वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देशाने सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळेच त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. आऱोपपत्रात एकूण २९ आरोपींचा उल्लेख आहे. त्यापैकी २६ आरोपींना अटक करण्यात आली असून तुरुंगात असलेल्या गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्यासह मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर या तीन फरारी आरोपींचा समावेश आहे.
पंजाब अँटी-गँगस्टर टास्क फोर्ससोबत संयुक्त कारवाईत मुंबई गुन्हे शाखेने आकाशदीपला अटक केली. तो या प्रकरणातील २४ वा आरोपी होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने जामीन अर्जावर सुनावणी केली. न्यायालयाने स्पष्ट केले की, आकाशदीपला देण्यात आलेल्या जामिनाचा इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर कोणताही परिणाम होणार नाही. आकाशदीपने बिश्नोई टोळीशी संबंधित गोळीबार करणारे आणि कट रचणाऱ्यांमध्ये समन्वयक म्हणून भूमिका बजावली. बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की त्याच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि घटनेपूर्वीचे कॉल रेकॉर्डच उद्धृत केले.
पोलिसांनी आतापर्यंत ८८ जणांचे जबाब नोंदवले असून माजी आमदार झिशान सिद्दिकीसह एकूण १८० साक्षीदारांची यादी केली आहे. त्याचबरोबर पाच बंदुका, सहा मॅगझीन आणि ३५ मोबाईल फोन जप्त केल्याचेही आरोपपत्रात नमूद आहे. या गुन्ह्यात लॉरेन्स बिश्नोईची प्रमुख भूमिका असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला आधीच सांगितले आहे. त्याचा फरारी भाऊ अनमोल बिश्नोई एक वेगळी टोळी चालवत असून ती प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सक्रिय आहे. बिश्नोईची ही टोळी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येसह अन्य काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये त्याचा हात असल्याच्या संशयावरून अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव अमेरिकेकड़े पाठवल्याचेही आरोपपत्रात म्हटले होते. या गुन्ह्यांध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचाही समावेश आहे. तर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अनमोल बिश्नोईला अटक करणाऱ्या माहितीसाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
बाबा सिद्दिकी (६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील वांद्रे भागात मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अटक करण्यात आलेल्या २६ आरोपींमध्ये कथित मुख्य शूटर शिवकुमार गौतम आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
