नागपूर, 20 ऑक्टोबर : इस्त्रायलच्या महिल्यांची राष्ट्रभक्ती आणि देशासाठीच्या योगदानापासून नारीशक्तीने त्यापासून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. नागपुरातील रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी समारोहात त्या बोलत होत्या. यावेळी बडोदा येथील श्री स्वामीनारायण देव महिला मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ.उर्वशी मिश्रा, कार्यवाहिका करुणा साठे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याप्रसंगी शांताक्का म्हणाल्या की, इस्त्रायली महिला आपल्या मुलांना लहानपणापासूनच देशभक्तीचे बाळकडू पाजतात. त्यामुळे तिथला प्रत्येक नागरिक देशभक्त असून ते देशासाठी प्राणपणाला लावण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. इस्त्रायलचा प्रत्येक नागरिक सैन्य प्रशिक्षण घेतो. त्यामुळेच हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान इनवा लिबरमन नामक तरुणीने शस्त्रसज्ज होऊन गावतील लोकांच्या मदतीने 25 दहशतवाद्यांना ठार केले.तेथील महिलांमध्ये देशाबाबत ज्या पद्धतीचे देशप्रेम व देशभर्ती आहे, त्यापासून नारीशक्तीने प्रेरणा घेतली पाहिजे असे आवाहन शांताक्का यांनी केले.
भारतातील सनातन धर्मात स्त्री-पुरुष दोन्ही एकच तत्त्व असल्याचे सांगितले आहे. वैदिक काळात स्त्रियांना कर्तृत्वाचे स्वातंत्र्य असल्याची उदाहरणे आहेत. परंतु, परिकीय आक्रमणांमुळे नंतरच्या काळात महिलांवर काही बंधने आली होती. आजकलच्या काळात समाजात महिलांचे शोषण होत असल्याचा अपप्रचार केला जातो. सनातन धर्माची डेंग्यू, मलेरियाशी तुलना केली जाते. अशा प्रकारच्या ‘निगेटीव्ह नॅरेटिव्ह’पासून सावध होण्याची गरज आहे. महिलांनी अशा भ्रामक प्रचाराचे खंडन करून सत्य गावोगावी पोहचवले पाहिजे असे शांताक्कांनी सांगितले.
समलैंगिक विवाहांच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना शांताक्का म्हणाल्या की, समलैंगिक विवाहाची मागणी फेटाळून सुप्रीम कोर्टाने कोट्यवधी लोकांच्या भावना आणि हजारो वर्षांच्या संस्कृतीचा सन्मान राखला. यापुढेही सर्वोच्च न्यायालय अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरांचा मान राखेल अशी अपेक्षा आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यिय खंडपीठाने हा निर्णय देताना 2 विरुद्ध 3 अशा बहुमताने दिला. याचाच अर्थ असा की, दोन न्यायाधिशांनी या याचिकेच्या मुद्द्यांना संमती दिली होती. आज अनेक जण विदेशातील प्रभावाखाली असून तशाच गोष्टी भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मत शांताक्का यांनी व्यक्त केले.
भारतातील कुटुंब आत्मकेंद्रित बनत आहेत व सुखाची कल्पना वेगळी होत आहे. मुळ सुखाच्या कल्पनेपासून लोक दूर जात आहे. यामुळे कुटुंबात भावना संकुचित होत आहेत. यातून बाहेर येत वसुधैव कुटुंबकम यासारखे श्रेष्ठ विचार समाजात पोहोचविले पाहिजे. कुटुंब भावनात्मक दृष्टीने सशक्त असायला हवे व संस्कृतीच्या मुळांशी जुळलेले पाहिजे, असे शांताक्का म्हणाल्या.तंत्रज्ञान, गणित, विज्ञानमध्ये मुलांपेक्षा भारतीय मुली समोर आहेत. करिअरला महिलांनी महत्त्व दिलेच पाहिजे. मात्र संस्कृतीशी देखील जुळून रहायला हवे. कोणत्याही क्षेत्रात रहा, मात्र कर्तव्य व काम भारतीय जीवनमूल्य व संस्कृतीनुसार हवे. महिलांनी ‘कॅरिअर विथ कल्चर’ला महत्त्व दिले पाहिजे, असे आवाहन शांताक्का यांनी केले.
