नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) अंमलबजावणी यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल विभागाने सोमवार, 4 मार्च रोजी नवी दिल्लीत सर्व राज्ये तसेच केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणी प्रमुखांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन होणार असून त्या बीज भाषणही देतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरीला आणि बनावट पावत्यांना आळा घालणे, सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे, समन्वय वाढवणे, तंत्रज्ञान आणि डेटा यांची सांगड घालणे, व्यवसाय सुलभीकरण आणि प्रभावी प्रतिबंधात्मक अंमलबजावणी उपाय यांचा सुवर्णमध्य गाठणे या मुद्य्यांवर या परिषदेत सांगोपांग चर्चा अपेक्षित आहे.
