नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ठोठावला दंड
मुंबई, 19 जानेवारी (हिं.स.) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशातील 5 सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आरबीआयने या बँकांना आर्थिक दंड ठोठावला आहे.
आरबीआयने एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक, मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, गुजरातची मेहसाणा नागरीक सहकारी बँक आणि गुजरातची पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड यांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार ज्या बँकांवर दंड आकारला जातो. तो फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या 5 बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने मुंबईच्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने केलेल्या तपासात असे समोर आले आहे की 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेने नफ्यातून देणगी देताना आरबीआयचे नियम पाळले नाहीत. तसेच कर्ज आणि अॅडव्हान्स देताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयने गुजरातमधील मेहसाणा सहकारी बँकेला 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. इतर नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि पाटडी नागरीक सहकारी बँक लिमिटेड आणि मेहसाणा नागरी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने एनकेजीएसबी सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना आरबीआयने सांगितले की, बँकेने चालू खाते उघडताना आरबीआयच्या नियमांचे पालन केले नाही आणि ग्राहकांना खात्यात व्यवहार करण्याची परवानगी दिली होती. तपासणीनंतर, आरबीआयने बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणावर रिझर्व्ह बँक समाधानी न झाल्यामुळे एनकेजीएसबी सहकारी बँकेला 50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
हिंदुस्थान समाचार
