नवी दिल्ली, 09 फेब्रुवारी : देशाचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना आज, शुक्रवारी भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय. उदारीकरण आणि देशाच्या विकासाच्या धोरणांना त्यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात चालना दिली होती. बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेल्या नरसिंह राव यांचे हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृतसह एकूण 10 भाषांवर प्रभूत्व होते. या भाषा लिहीणे, वाचणे, बोलणे यासोबतच ते उत्तम पद्धतीने भाषांतर देखील करू शकत होते. इतक्या भाषांवर प्रभूत्व असलेले ते देशाचे एकमेवर नेते होते.
पी.व्ही. नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी आंध्र प्रदेशातील करीमनगर येथे झाला. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. पी.व्ही. नरसिंह राव यांना 3 मुले आणि 5 मुली अशी एकूण 8 अपत्ये आहेत.व्यवसायाने कृषीतज्ज्ञ आणि वकील असलेल्या राव यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी 1962 ते 1964 पर्यंत कायदा आणि माहिती मंत्री, 1964 ते 1967 पर्यंत कायदा आणि न्याय मंत्री, 1967 मध्ये आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री आणि 1968 ते 1971 पर्यंत आंध्र प्रदेश सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. तसेच 1971 ते 1973 पर्यंत ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 1975 ते 76 दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, 1968 ते 74 पर्यंत आंध्र प्रदेशच्या तेलुगू अकादमीचे अध्यक्ष आणि 1972 पर्यंत दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, मद्रासचे उपाध्यक्ष होते.
यासोबतच 1957 ते 1977 पर्यंत ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य होते, 1977 ते 1984 पर्यंत लोकसभेचे सदस्य होते आणि डिसेंबर 1984 मध्ये नागपूर जिल्ह्यातील रामटेकमधून आठव्या लोकसभेवर निवडून आले होते. त्यांनी 1978-79 मध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ एशियन अँड आफ्रिकन स्टडीजने आयोजित केलेल्या दक्षिण आशियावरील परिषदेत भाग घेतला होता. राव हे भारतीय विद्या भवनच्या आंध्र केंद्राचे अध्यक्षही होते. ते 14 जानेवारी 1980 ते 18 जुलै 1984 पर्यंत परराष्ट्र मंत्री, 19 जुलै 1984 ते 31 डिसेंबर 1984 पर्यंत गृहमंत्री आणि 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 पर्यंत संरक्षण मंत्री होते. तसेच 5 नोव्हेंबर 1984 पासून त्यांनी नियोजन मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. त्याचप्रमाणे 25 सप्टेंबर 1985 पासून त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारला. नरसिंह राव यांनी लोकशाहीचे दहावे पंतप्रधान होण्यापूर्वी 3 भाषांमध्ये प्रचार केला होता.
