नांदेड, २२ ऑक्टोबर : मराठा आरक्षणासाठी सुनील कावळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. असे असताना याच मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील शुभम पवार (२४) या तरुणाने आत्महत्या केली आहे.
मुंबईवरून परत गावाकडे येत असताना विष पिऊन अर्धापूर गावाजवळ त्याने आत्महत्या केली. शुभमच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. शुभमच्या मृतदेहाशेजारी विषारी औषधाचा डबा, पावती आणि एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीमध्ये एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण देण्यासाठी मी माझ्या जिवाचे बलिदान देत आहे. माझे बलिदान वाया जाऊ नये, असे लिहिले आहे. पोलिसांनी शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपुरी रुग्णालयात पाठवला होता.
दरम्यान सकल मराठा समाजाकडून शुभमच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० लाखांची मदत, त्याच्या बहिणीला सरकारी नोकरी, कुटुंबाला घरकुल या मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम पवार हा प्लंबर म्हणून काम करत होता. शनिवारी तो मुंबईहून रेल्वेने नांदेड येथे आला होता. वडिलांना फोन करुन शुभमने आपण बहिणीकडे जाऊन फ्रेश होऊन गावी येतो असे सांगितले. मात्र संध्याकाळी सातपर्यंत शुभम घरी परतला नाही. वडिलांनी वारंवार त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर त्याच्या भावाने पुतणीला फोन करुन शुभमबाबत विचारणा केली. त्यावर शुभम इथे आला नसल्याचे त्यांनी सांगितले. शुभमच्या वडिलांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शुभमचे मोबाईल लोकेशन जाऊन तपासले असता नरहरी मंगल कार्यालयाच्या शेजारी त्याचा मृतदेह आढळून आला.
